औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शहरातील महेशनगर परिसरात ११४आणि ११५ या दोन बुथची जबाबदारी संपूर्ण महिलांनाच दिली आहे. काल सकाळी ७ वाजल्यापासून ते संपूर्ण मतदान यंत्र जमा करण्यापर्यंतच्या संपूर्ण जबाबदारी महिलांनीच सांभाळली.
महेशनगर परिसरात महाराष्ट्र पब्लिक स्कूल येथे सखी केंद्रावर ११४ व ११५ अशा दोन बुथची जबाबदारी आठ महिलांनी सांभाळली. याशिवाय महिला पोलिस कर्मचार्यांनी या मतदान केंद्रावर सहकार्य केले. या सखी मतदान केंद्रावर जवळपास ५ हजार ५०० मतदात्यांची संख्या आहे. यासर्व मतदात्यांना मतदान करण्यासाठी महिलांनी सहकार्य केले. या सखी केेंद्राच्या ११४ बुथची जबाबदारी रंजना राठोड, पद्मा वायकोस, गीता बावत, मीरा सराईकर तसेच ११५ बुथची जबाबदारी सुषमा राऊतमारे, प्रिया वाकोडे, यशोदा परदेशी, पल्लवी श्रीखंडे, वैशाली सुतवणे, अंधत्व, अपंग मदतनीससाठी बी.ए. मोरे या महिलांनी संपूर्ण मतदान केेंद्राची जबाबदारी संभाळून महिला कुठलीही जबाबदारी चोखपणे करू शकतात हे दाखवून दिले. तसेच पोलिस कर्मचारी म्हणून महिला पोलिस नाईक स्वाती बनसोडे, मनिषा सहाणे, संगीता बडगुजर यांनी काम पाहिले.
शहरातील टाईम्स कॉलनी येथील आयशा मोतीवाला इंग्रजीपूर्व प्राथमिक शाळा, सातारा परिसर येथील चाटे स्कूल, नवखंडा महविद्यालय याशिवाय ग्रामीण भागातही सखी मतदान केंद्राची जबाबदारी महिलांनीच सांभाळली. त्यात कन्नड येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, गौताळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडा, नारायणपूर गणेशवाडी जि.प. शाळा, वेरुळ जि.प प्राथमिक शाळा, वैजापूर येथील लक्ष्मीनगर प्राथमिक शाळा, स्वामी समर्थ विद्यालय या मतदान केंद्राची जबाबदारी मतदान केेंद्राची जबाबदारी महिलांनी सांभाळली.